मुंबई :- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए २५ हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याने दुहेरी गटातील विजेतेपदा बरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन यांनी विजेतेपद संपादन केले.
एमएसएलटीए आयटीएफ टेनिस स्पर्धा…
-एकेरीत रामकुमारला दुहेरी मुकुटाची संधी
-दुहेरीत पुरव राजासह पटकाविले विजेतेपद
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित लुई वेसेल्सचा ७-६(३), ६-३ असा पराभव करून सनसनाटी निकालासह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना १ तास २५ मिनिटे चालला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या सिद्धार्थ विश्वकर्माने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अमेरिकेच्या हॅरिसन अँडम्सचा ७-६(५), ६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना १ तास ३९ मिनिटे चालला.
दुहेरीत अंतिम फेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन या अव्वल मानांकित भारतीय जोडीने अमेरिकेच्या हॅरिसन अॅडम्स व युक्रेनच्या व्लादिस्लाव ऑर्लोव्ह यांचा ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.