एक ड्रायव्हर ते प्रसिद्ध उद्योगपती, प्रगतशील शेतकरी मग गावचा आदर्श सरपंच. हा खडतर आणि संघर्षशील तसेच थक्क करणारा प्रवास असला तरी मार्गक्रमण आणि वाटचाल तितकी सोपी नव्हती; मात्र जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर यशस्वी प्रवास केलेले सविंदणे गावचे माजी आदर्श सरपंच वसंतशेठ गहिना पडवळ हे नाव तालुक्याला परिचित आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यावर टाकलेला प्रकाशझोत…
शिरूर तालुक्यातील सविंदणे गावातील अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हुशार असूनही पैसे नसल्याने दहावीनंतर अर्धवट शिक्षण त्यांनी सोडले. मात्र, प्रचंड आत्मविश्वास व पाहिलेली स्वप्ने उराशी बाळगून अनेक खडतर अडचणींवर त्यांनी मात केली. तीक्ष्णबुद्धी, हजरजबाबीपणा, लढावूवृत्ती, संघटनकौशल्य, चाणाक्षवृत्ती, नेतृत्वगुण असे अनेक गुण त्यांच्या अंगी असल्याने वसंतशेठ पडवळ यांनी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर ते प्रसिद्ध उद्योगपतीपर्यंतची यशस्वी मजल मारली आहे.
विशेष कार्यकारी अधिकारी, प्रगतशील शेतकरी, मग सरपंच, अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा जोरदार ठसा त्यांनी उमटविला आहे. यासाठी त्यांना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे.
विद्वान, अभ्यासू, समर्पित आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. आपुलकी आणि जिव्हाळ्याचे असणारे सबंध तसेच मित्रांवर जिवापाड प्रेम करणारा “याराना’ आणि मैत्री कशी असावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे वसंतशेठ पडवळ आहे. याचा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे.
संयमी व्यक्तिमत्त्व
वसंत पडवळ यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, मितभाषी म्हणून परिचित आहे. आपल्या कौशल्य, ज्ञानाचा वापर हा गावहितासाठी व्हावा, हा त्यांचा हेतू तालुक्यातील नेत्यांना भावतो. त्यामुळे वरिष्ठ नेते त्यांच्यासाठी विकासकामांसाठी भरीव निधी देतात. हीच त्यांच्या कामांची पोचपावती आहे. हे गावाने अनेकवेळा अनुभवले आहे.
समाजहित जपले
वसंत पडवळ यांनी समाजभान जपत सर्व घटकांना न्याय दिला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावविकासाचा ध्यास घेतल्याने लोकांनी त्यांच्यावर विश्वासार्हतेची मोहोर उमटविली आहे. त्यांनी विकासकामे मार्गी लावताना समाजहिताला प्राधान्य दिले आहे. व्यावसायिकता जोपासत त्यांची गावासाठी तळमळ मोठी आहे. कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे.
लक्षवेधी विकासकामे
सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या व्यवसायातून लाखमोलाचा वेळ काढत सविंदणे गावचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अनेक विकासकामे गावामध्ये मोठ्या प्रमाणात केली. मग यामध्ये गावातील रस्ते, फिल्टर पाण्याची व्यवस्था, श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील कंपाऊड, कुस्तीचा आखाडा, हायमॅक्स दिवे, स्मशानभूमी सुशोभिकरण, ग्रामपंचायतची भव्य दिव्य इमारत अशी कोट्यवधी रुपयांची अनेक विकासकामे त्यांनी अल्पावधीत मार्गी लावली आहेत. अनेक लोकांना आजारपणात, शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देत सामान्यांना जगण्यासाठी त्यांनी उभारी दिली आहे.
शैक्षणिक कार्यात अग्रेसर
वसंतशेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शेकडो कार्यकर्ते सविंदणे गावामध्ये गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, शैक्षणिक साहित्य वाटप करतात. सोबतच मोठ्या थाटामाटात गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भोजन देऊन अनेक वर्षांपासून वाढदिवस साजरा करतात. सामाजिक बांधिलकीचा धागा त्यांनी घट्ट विणला आहे. आपल्या खडी क्रशर व्यवसायाच्या माध्यमातून ते शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.
निधी खेचून आणण्याची क्षमता
माजी आदर्श सरपंच वसंतशेठ पडवळ यांनी गावची असलेली अतूट नाळ कधी तुटू दिली नाही. त्यांनी सरपंचपदाची कारकीर्द भूषविल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गावकऱ्यांनी सत्ता दिली. त्याचे सोनं करण्याची किमया वसंतशेठ पडवळ यांनी केली आहे. आपल्या कारकिर्दीतील अनुभवाची शिदोरी आता नवीन गावकारभाऱ्यांना देत आहेत. गावासाठी विकासनिधी खेचून आणत आहेत. हा त्यांचा गावासाठी असलेला ध्यास आपुलकीचे नाते निर्माण करणारा आहे. यापुढेही हा विकासमंत्र कायम ठेवतील, याची गावाला खात्री आहे.
मिळालेल्या संधीचे सोनं
2017- 2019 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना सरपंचपदाची संधी मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून आलेल्या वसंतशेठ पडवळ यांना सर्वसामान्यांविषयी जाण होती. त्यामुळे त्यांनी गावाला गावपण देण्याचे काम केले आहे. माजी सरपंच वसंतशेठ पडवळ यांनी 2017 ते 2019 या कार्यकाळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत मोठा विकासनिधी सविंदणेला दिला आहे.
त्यांना विविध विकासकामे करताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोर, अरुणकुमार मोटे यांनी भक्कम साथ दिली. त्यांच्या पॅनलच्या मार्गदर्शनाखाली सध्या सविंदणे ग्रामपंचायतीचा कारभार हाकला जात आहे. सरपंच शुभांगी पडवळ, माजी सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच भोलेनाथ पडवळ, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावचा कारभार दमदारपणे चालवत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या निधींची विकासकामे सुरू आहेत.
संकलन : अरुणकुमार मोटे, सविंदणे