मुंबई – अदानी पोर्टस स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीला तिसऱ्या तिमाहीत झालेला नफा 12.94 टक्क्यांनी कमी होऊन 1,336 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत या कंपनीला 1,535 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ताळेबंद जाहीर करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी सांगितले की, कंपनीने इस्त्राईल मधील एक बंदर खरेदी केले आहे.
या बंदरातून औपचारिक कामकाज लवकरच सुरू होणार आहे. कंपनी आगामी काळात साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत भांडवली गुंतवणूक करणार असली तरी 5 हजार कोटी रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वी फेडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने सरलेल्या नऊ महिन्यात 252.9 दशलक्ष मेट्रिक टन मालाची चढउतार केली.
अदानी ग्रीन एनर्जीला नफा –
अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीला तिसऱ्या तिमाहीत झालेला नफा दुपटीने वाढून 103 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत या कंपनीला 49 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी सांगितले की, आगामी काळात कंपनीची उलाढाल आणि नफा वाढण्याची शक्यता कायम आहे.