मुंबई – जागतिक बाजारातून संमिश्र संदेश आले असतानाच भारतीय शेअर बाजारात ग्राहक वस्तू आणि पोलाद क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 220 अंकांनी कमी होऊन 60,286 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 43 अंकांनी कमी होऊन 17,721 अंकावर बंद झाला.
रिझर्व्ह बॅंकेचे पत धोरण बुधवारी जाहीर होणार आहे. अमेरिकेतील घडामोडीकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक अस्थिर असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेत रोजगार निर्मिती वाढली आहे. अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांना वाटत आहे. कालपासून अमेरिकेच्या शेअर बाजाराबरोबरच इतर देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्याचा परिणाम परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल रलवकरच भाष्य करणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान परदेशी गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून सोमवारी या गुंतवणूकदारांनी 1,218 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
अमेरिकेतील व्याजदर वाढीबरोबरच हे गुंतवणूकदार चीन, दक्षिण कोरिया यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात गुंतवणूक करीत असल्यामुळे भारतीय शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात आगोदरच बरीच गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत.
अशा परिस्थितीत भारतीय कंपन्यांचे शेअर वेगाने वाढणाऱ्या इतर देशातील कंपन्यांच्या शेअरपेक्षा महाग आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतापेक्षा इतरत्र अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढल्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
आयटीसी, सन फार्म पिछाडीवर
सेन्सेक्स समभागांपैकी टाटा स्टील 5.23 टक्क्यांनी घसरला. आयटीसी, सन फार्मा, मारुती, एम अँड एम, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, एचयूएल, भारती एअरटेल आणि रिलायन्सचे नुकसान झाले. कोटक बॅंक सर्वाधिक 1.59 टक्क्यांनी वाढली, त्यानंतर इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचा क्रमांक लागतो. एलअँडटी, एसबीआय, टीसीएस आणि एचडीएफसी बॅंकही तेजीत बंद झाले.