नवी दिल्ली – उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील माध्यम कंपनीने प्रख्यात न्यू दिल्ली टेलीव्हिजन लिमिटेड अर्थात एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेअर्स खरेदी केल्याची घोषणा केली आहे. तूर्त हे शेअर्स अप्रत्यक्षपणे खरेदी केले गेले आहेत. ज्या एका कंपनीकडे एनडीटीव्हीचे शेअर्स होते, त्या कंपनीकडून अदानी यांच्या कंपनीने हे शेअर्स खरेदी केले आहेत.
तसेच आता अदानी समुह थेटपणे एनडीटीव्हीचे 26 टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. तसे झाल्यावर अदानी समुहाकडे 55 टक्के समभाग असतील व एनडीटीव्हीची मालकीही या समुहाकडे येणार आहे. सध्या प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांची एनडीटीव्हीत हिस्सेदारी आहे.
अदानी समूहाने याबाबत जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, त्यांनी 114 कोटी रूपयांत विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडची खरेदी केली आहे. याच कंपनीकडे एनडीटीव्हीची शेअर होल्डींग कंपनी आरआरपीआरचीही हिस्सेदारी होती. जी आता त्यांनी अदानी समुहाच्या अदानी मीडिया नेटवर्क लिमिटेडकडे सूपूर्द केली आहे.
या सौद्यामुळे आता भारतातील सगळ्यांत प्रतिष्ठित एनडीटीव्हीच्या माध्यमातून अदानी समुहाचा माध्यम क्षेत्रातही प्रवेश झाला आहे. एनडीटीव्ही सध्या तीन वृत्तवाहिन्यांसह अर्थात न्यूज चॅनलसह डीजीटल मीडियाचा सशक्त प्लॅटफॉर्म चालवते आहे.
उर्जा क्षेत्रापासून बंदरांपर्यत सगळ्याच क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अदानी समुहाने माध्यम क्षेत्रात अगोदरच प्रवेश केला होता. या समुहाने क्विंटिलीयन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्येही यापूर्वीच समभाग खरेदी केली आहे. त्यानंतरच अदानी समुह एनडीटीव्हीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या बातम्या होत्या. मात्र त्यावेळी अदानी आणि एनडीटीव्ही या दोघांकडून याचा इन्कार करण्यात आला होता. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.