Dharavi Redevelopment Project: मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत आहेत. आता अदानी समूहाने या प्रकल्पाची जबाबदारी एका जागतिक समूहाकडे सोपवली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRPPL) नुसार, त्यांनी वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर, अमेरिकन डिझाईन फर्म सासाकी आणि ब्रिटीश कन्सल्टन्सी फर्म बुरो हॅपोल्ड यांच्याशी भागीदारी केली आहे. हाफीज कॉन्ट्रॅक्टरला अनेक सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात येते.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, धारावीत लाखो लोक राहतात. या छोट्याशा परिसरात हजारो छोटी घरे बांधण्यात आली आहेत. धारावी झोपडपट्टी ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील एक गरीब वसाहत म्हणून ओळखली जाते. या भागातील हजारो लोकांना शुद्ध पाणी आणि स्वच्छ शौचालयेही उपलब्ध नाहीत.
अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 619 दशलक्ष डाॅलरची बोली लावली होती. या अंतर्गत अदानी समूहाला 625 एकर (253 हेक्टर) क्षेत्र विकसित करायचे आहे. जगातील सर्वात मोठी शहरी विकास योजना म्हणून याचे वर्णन केले जात आहे. डीआरपीपीएलची स्थापना जुलैमध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान,धारावीच्या विकासासाठी 1980 मध्ये पहिल्यांदा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, कोणत्या ना कोणत्या कारणाने हा प्रकल्प दरवेळी लांबणीवर पडत गेला. महाराष्ट्र सरकारने अखेर जुलैमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतरही या प्रकल्पाविरोधात वारंवार निदर्शने सुरू आहेत.