नाशिक – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रिया बेर्डे यांनी ७ जुलै २०२० मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. या कोरोनाकाळात बेर्डे यांनी अनेक कलाकारांना मदतीचा हात देत चांगलेच कामही केले होते. तसेच शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं प्रिया बेर्डे यांनी त्यावेळी म्हंटले होते. त्यानंतर दोन वर्षातच त्यांनी घड्याळ काढून टाकत हाती कमळ घेतल्याने सिने वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.
प्रिया बेर्डे यांच्या पक्षांतराचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.नाशिकमध्ये भाजपाची दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक पार पडली यावेळी बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.राष्ट्रवादी पक्षातून राजीनामा देऊन चार महिने झाले आहेत. मला फक्त आणि फक्त कलाकारांसाठी काम करायचे आहे. पक्षातील वरिष्ठ नेते मला कोणती जबाबदारी देतात ते बघूया पण मला कलाकारांसाठी काम करायचे असल्याचे बेर्डे यांनी आईवेळी सांगितले.
प्रिया बेर्डे यांच्यासह दिग्दर्शक मधुरा जोशी, मनिषा मुंडे, विद्या पोकळे, गिरीश परदेशी, दत्तात्रय जाधव, वेदांत महाजन यांच्यासह आणखी काही दिग्गज कलाकारांनी आज भाजप पक्षात प्रवेश केल्याचे समजते.