उंब्रज -करोनाने संपूर्ण मानवी जीवनच ठप्प झाले आहे. अनेकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याला अपवाद कोणीच नाही. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सगळेच घरी बसून आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडती मिसेस मुख्यमंत्री या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमधील सर्वांचे लाडके पात्र असणारा बबन म्हणजेच रोहित चव्हाण याचाही समावेश आहे. तो सध्या शेती करण्यात व्यस्त आहे.
रोहित चव्हाण हा उंब्रज विभागातील हिंगनोळे ता. कराड येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील आहे. त्याने अनेक नाटक, सिरीयल, चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा कॉमेडीचा बादशाह हा किताब पटकावला आहे. अशा या रोहितला झी मराठीवर लोकप्रिय मालिका मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील बबन ही मध्यवर्ती भूमिका करायला मिळाली. त्या भूमिकेचे त्याने सोने केले.संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना मराठी माणसाच्या मनामनात त्याने घर केले आहे.
गेले वर्षभर या मालिकेच्या चित्रीकरणामुळे व्यस्त असणारा रोहित सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या गावात आहे. लॉकडाऊनने सर्वच मालिकांचे चित्रीकरण बंद झाले आहे. पर्यायाने रोहितवरही काम नसल्यामुळे बसून राहण्याची वेळ आली होती. पण हाडाचा शेतकरी असणारा रोहित याने बाहेरगावी न जाता आपले गाव बरं म्हणत हिंगनोळे या गावी आपल्या शेतात रममाण होत स्वतःला व्यस्त ठेवले आहे.
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेसाठी गेली वर्षेभर सलग काम सुरू होते. सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत त्यांचे काम सुरू होते. इतक्या दिवसांच्या सहवासाने त्यांच्यात एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. ते नातं या लॉकडाऊने लॉक करत या सर्वांची ताटातूट केली. रोहित मुळचा शेतकरी असल्याने त्याने स्वत:ला शेतीच्या कामात व्यस्त ठेवले आहे .पण इतर सहकलाकार शहरातील आहेत. ते आता घरी बसून वैतागून गेल्याच त्याने सांगितले. मला मागील वर्षभरात कुटुंबासाठी वेळ देता आला नव्हता. पण, सध्या गावी असल्याने परिवारातील सदस्य खूष असल्याचे त्याने सांगितले.
झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत बबन (रोहित) व सुमीचे (अमृता) यांच बहिण भावाचे नाते आहे. इतक्या दिवसांच्या सहवासाने हे नातं खऱ्या आयुष्यातही तसेच वाटू लागले आहे. छोटी बहीण म्हणून अमृता हक्काने काही गोष्टी सांगते. लॉकडाऊनमुळे या नात्यात दुरावा आल्याचे सांगताना रोहितच्या डोळ्यात पाणी आले.