पुणे – कारमधून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या कारला लोहगाव परिसरात विमानतळ पोलिसांनी पकडले. या कारमधील 35 लिटर गावठी दारू जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
गणेश नामदेव राखपसरे (रा. कुंभार वस्ती, लोहगाव) आणि संतोष ज्ञानेश्वर इरले (रा. राखपसरे वस्ती, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वडगाव शिंदे येथून एका कारमध्ये गावठी दारू विक्रीसाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत गिरी यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांच्या पथकाने दोघांना पकडले.
तसेच, नगर रस्त्यावरील खुळे वस्ती भागात सत्यवान खुळे याच्या म्हशीच्या गोठ्यात चोरून दारूची विक्री होत होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणाहून 35 लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी शोभा सत्यवान खुळे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सेनापती बापट रस्ता परिसरात विदेशी मद्याची विक्री करताना दोन व्यक्तींना सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. त्याच्याविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.