वॉशिंग्टन – करोनाची सर्वाधिक बाधा झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इकॉनॉमी सुरू करण्याची घाई झाली असून त्यांनी म्हटले आहे की, त्या विषयी राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घेण्याऐवजी आता निर्बंध उठवण्याचे सर्वाधिकार त्या त्या प्रांतांनाच देण्यात आले आहेत. त्यामुळे 1 मेच्याही आधी काही प्रांतातील आर्थिक व्यवहार सुरू होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या अमेरिकेतील सर्व 50 प्रांतात करोनाची लागण झाली असून त्या सर्व प्रांतात आता लॉकडाऊन सुरू आहे. अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा आता साडेसहा लाखांपर्यंत गेला असून रोज हजारोंच्या संख्येने रूग्ण वाढत आहेत. तेथील मृतांचा आकडा 25 हजारांच्याही वर गेला आहे. तथापि शक्य तितक्या लवकर इकॉनॉमी सुरू करण्याचा इरादा अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात 17 दशलक्ष लोकांचे रोजगार गेले असून त्यांनी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केले आहेत.