पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी अडीच हजार बेवारस वाहने रस्त्यावर धूळ खात पडून आहेत. या वाहनांवर आरटीओ, महापालिका आणि पोलीस संयुक्तरित्या कारवाई करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.
सोमवारी महापालिका भवनात पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत रस्त्यावरील बेवासर वाहनांबाबत चर्चा झाली. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरात अडीच हजार बेवारस वाहने रस्त्यावर धूळखात पडली असल्याची माहिती समोर आली. या बेवारस वाहनांच्या क्रमांकावरून आरटीओ मालकाचा नाव, पत्ता देणार आहे. त्यानुसार मालकाला ही वाहने रस्त्यावरून काढण्याची सूचना देणार आहे. त्यानंतरही ही वाहने रस्त्यावर कायम राहिल्यास अशा वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेस आहे. त्यानुसार ही अडीच हजार वाहने जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त बिष्णाई यांनी दिली.
जानेवारी महिन्यात रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे. यासाठी महापालिकेला आवश्यक असणारा बंदोबस्त पोलीस पुरविणार आहे. या कारवाईमुळे रस्त्यावर दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी हाईल. तसेच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी अडचणही दूर होईल, असेही आयुक्त यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वी पोलिसांना दिले आहेत. त्युानसार आत्तापर्यंत 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 1005 जणांवर पोलिसांनी कारवाई करीत खटले दाखल केले असून काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक कारवाई भोसरी एमआयडीसी (166), तळेगाव (152), निगडी (93) यांनी केली आहे. तर सर्वांत कमी कारवाई चाकण (6), चिंचवड (23) आणि देहूरोड (35) यांनी केली आहे. तसेच महापालिकेने 24 ठिकाणी हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई केल्याची माहिती पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे.
छेडछाड प्रतिबंधक पथके निष्क्रिय
हैद्राबाद येथे महिलेवर झालल्या अत्याचार प्रकरणानंतर स्थापन करण्यात आलेल्या छेडछाड प्रतिबंधक पथकाने 20 ठिकाणी कारवाई केली. यामध्ये आळंदी (8), वाकड (5), चिखली (3), सांगवी देहूरोड (प्रत्येकी दोन) ठिकाणी कारवाई करण्यात आली. इतर उर्वरित दहा पोलीस ठाण्याने छेडछाडीबाबत काहीच कारवाई केलेली नाही. आयुक्तालयाच्या हद्दीतील तब्बल दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही पथके निष्क्रिय राहिल्याचे दिसून आले आहे.