नऊ महिन्यांतच बांधकाम विभागाचे उद्दिष्ट पूर्ण
पिंपरी – एकीकडे रियल इस्टेट, बांधकाम व्यवसाय मंदीच्या दृष्टचक्रातून जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत बांधकाम परवानगीतून तब्बल 509 कोटी रुपयांचे भरीव उत्पन्न मिळाले आहे. पहिल्या नऊ महिन्यांतच 509.5 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाल्याने चालू वर्षासाठी ठेवण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी तीन महिने शिल्लक असून या कालावधीत 100 ते 150 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बांधकाम विभागाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या दोन्ही बाजूला हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. त्यामुळे शहरातच राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशाने घरे खरेदी केली जात आहेत. शहरात गृहप्रकल्प वाढत असल्याने बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडत आहे.
मागील आर्थिक वर्षात महापालिकेला बांधकाम परवानगीतून 509 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर यंदा नऊ महिन्यांतच 509.5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला वर्षभरासाठी 510 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट होते. ते पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी तीन महिने शिल्लक आहेत. तीन महिन्यांत 100 ते 150 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास बांधकाम विभागाला आहे. चालू आर्थिक वर्षात बांधकाम विभाग सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग ठरेल आहे.
चांगल्या पायाभूत सुविधांचा परिणाम- राजन पाटील
याबाबत बोलताना शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, बांधकाम परवानगी देण्याची महापालिकेची प्रक्रिया सुलभ व ऑनलाईन आहे. परवानगीची प्रक्रिया जलद होते. महापालिका मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत आहे. त्यामुळे विकसक गुंतवणूक करत आहेत. विस्तीर्ण रस्ते, रस्तांचे सुशोभीकरण आहे. पर्यावरण स्वच्छ आहे. त्यामुळे शहरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई वाढल्यामुळे नागरिकांचा अधिकृत घरे घेण्याकडे कल वाढला आहे.