चंडीगढ -विमान प्रवासाची माहिती दडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शनिवारी केले. प्रसंगी पासपोर्ट जप्तीचे पाऊल उचलण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
करोना फैलावामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाब मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, पुढील काही दिवसांत निवृत्त होणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवेचा कार्यकाळ तीन महिन्यांनी वाढवला जाणार आहे. करोनाविरोधी लढ्यासाठी पंजाबला निधीची गरज आहे. त्यामुळे सर्व सरकारी विभागांच्या खर्चात कपात केली जाणार आहे. त्यातून आरोग्य विभाग, पोलीस दलासाठी पैसा उपलब्ध केला जाणार आहे.
जनतेच्या जीविताच्या रक्षणाला आमचे प्राधान्य आहे. त्यातून संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे अमरिंदर यांनी स्पष्ट केले. पंजाबमधील करोनाबाधितांच्या संख्येने याआधीच पन्नाशी ओलांडली आहे. त्यातील पाच रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच पंजाबही करोनावर मात करण्यासाठी सरसावला आहे.