‘दुकाने बंद,सेवा बंद नाही’; राजगुरूनगर पॅटर्न पुढील दहा दिवस सुरु राहणार

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : ‘दुकाने बंद सेवा बंद नाही”, जीवनावश्यक वस्तूंची २४ तास होम डिलिव्हरी हा  राजगुरूनगर पॅटर्न पुढील दहा दिवस सुरु राहणार असल्याचा निर्णय आज शहरातील व्यापारी दुकानदार भाजी विक्रेते यांच्यासह छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकऱ्यांच्या उपस्थित घेतल्याने राज्यात राजगुरूनगर पॅटर्न प्रेरणादायी ठरणार आहे. राजगुरूनगर नगर परिषदेत आज शनिवारी (दि ५) रोजी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, मुख्याधिकारी मछिंद्र घोलप, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आरोग्य समिती सभापती संपदा सांडभोर, नगरसेवक शंकर राक्षे, मनोहर सांडभोर, संदीप सांडभोर, सुरेश कौदरे, रफिक मोमीन, राहुल आढारी, किशोर ओसवाल, मंगेश गुंडाळ, निलेश घुमटकर, राजू जाधव, मछिंद्र राक्षे, पोलीस हवालदार संदीप भापकर, सर्जेराव बागल, व्यापारी प्रतिनिधी स्वानंद खेडकर, विनय लोढा, बलदोटा, कुशल ओसवाल, संजय पांढरकर उपस्थित होते.

करोना विषाणूची महामारी देशात पसरत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन आहे. राजगुरूनगर शहरातही खबरदारी म्हणून लॉकडाऊन बरोबर शहर गेली तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहे यात व्यापारी वर्गाचे मोठे सहकार्य लाभले आहे. राजगुरुनगर शहर व खेड तालुक्यात करोना विषाणूंचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासन प्रभावी उपाययोजना राबवत असताना त्याला आता राजगुरूनगर शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱयांनी व नागरिकांनी मोठी साथ दिली आहे हि साथ अशीच पुढील दहा दिवस ठेवण्याला व्यापारी नागरिक आणि प्रशासनाने स्वखुशीने परवानगी दिल्याने पुढील दहा दिवस शहरात पूर्णतः बंद पाळला जाणार आहे तर जीवनावश्यक वस्तू २४ तास घरपोच देण्याच्या व्यवस्था करण्यात आली आहे.

राजगुरूनगर शहर गेली तीन दिवस बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा व्यापारी वर्गाचे म्हणणे नगर परिषद व अधिकारी वर्गाने जाणून घेतले. यामध्ये जसे तीन दिवस सहकार्याची आणि समजदारीची भूमिका घेतली तशीच पुढील दहा दिवस घेण्यात येणार असून राजगुरुनगर पॅटर्न सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद ठेवून नागरिकांना सर्व छोट्या मोठ्या वस्तू घारपोच देण्याची सोय व्यापारी नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने केली असल्याने या पॅटर्नची चर्चा आता देशात सुरु राहणार आहे. दुकान बंद, सेवा बंद नाहीत असे फलक आता जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानाच्या बंद दरवाजावर दिसणार आहेत. तर भाजी पाला घरपोच देण्यासाठी नगर परिषदेच्या परवानगीने ९ वाहने ठेवण्यात येणार आहेत दोन वार्ड मिळून एक गाडीतुन २४ तास भाजीपाला सेवा देणार आहे.

पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी म्हणाले, शहरात भाजीपाला घेण्यासाठी सर्वाधिक गर्दी होते यावर उपाय म्हणून शहरात १८ वार्डमध्ये ९ भाजीपाला विक्री करणाऱ्या गाड्या उपलब्ध करण्यात येतील. त्या गाडीतूनच भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा घराच्या बाहेर कोणीही पडू नये राजगुरूनगर पॅटर्न सर्वानी पाळावा.

मुख्याधिकारी मछिंद्र घोलप म्हणाले, सर्वानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या महामारीचा सामना केला पाहिजे, समाजाला संकटात कोणीही टाकू नये नगरपरिषदेला सहकार्य करावे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये सर्व सेवा वस्तू घरपोच देण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज आहे.

पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे म्हणाले, व्यापारी वर्गाने सहकार्य केल्यास राजगुरूनगर पॅटर्न राज्यात जाईल. २४ तास दुकानातू नागरिकांना सर्व वस्तू घरोच दिल्या जातील पोलीस कोणालाही त्रास देत नाहीत नागरिकांनी स्वच्छेने बंद पाळला पाहिजे. शहरात सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याने व्यापारी आणि नागरिक यांनी घेतलेला हा निर्णय चांगला आहे. होम डिलिव्हरी सत्ताही पोलीस यंत्रणाही २४ तास नागरिकांना मदत करेल.

नगराध्यक्ष शिवाजी मांदळे म्हणाले, शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी गेली तीन दिवस मोठे सहकार्य केले आहे. करोना ची महामारी रोखण्यासाठी नागरिक घरी थांबले अजूनही दहा दिवस घरी थांबा. तुम्हाला आवश्यक सर्व सेवा सुविधा २४ तास घरपोच देऊ, कोणीही रस्त्यावर येऊ नका. एक चूक महाग पडेल यासाठी आम्ही तुमच्या सेवेला आहोत. दूध साखर, मीठ मसाला भाजीपाला सर्वकाही घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. दहा दिवस घरीच थांबा सुरक्षित रहा.

तहसिलदार सुचित्रा आमले म्हणाल्या, लॉकडाऊनच्या काळातील सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहचवल्या जात आहेत. कोणाचीही अडवणूक केली जात नाही. अन्नधान्य साठा मुबलक आहे. पुणे मुंबई येथून दुकानदारांना माल आणण्यासाठी परवानगी आहे. कोणीही दुकानदाराने दरवाढ करू नये. परिस्थितीचा धोक्याची आहे सगळया नागरिकांचा विचार करा. काही दिवस त्रास सहन करा आपली सुरक्षा महत्वाची आहे. कोणाचाही गैरसमज होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. व्यापारी वर्गाला प्रशासनाचे सर्व प्रकारचे सहकार्य राहिले. नागरिकांनी बाहेर पडू नये.दुकान बंद सेवा बंद नाही याचे सर्वानी अनुकरण करावे. सर्वांचे आभार नगरसेविका संपदा सांडभोर यांनी मानले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.