लोणावळा, (वार्ताहर) – रमजान ईद लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त शहरातील रायवूड येथील मदिना मस्जिदच्या मैदानात गुरुवारी सकाळी 8 वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आले. हजारो मुस्लिम बांधव या नमाज पठणात सहभागी झाले होते. याशिवाय लोणावळा गावठाण, खंडाळा, वलवण याठिकाणी असलेल्या मस्जिद परिसरात देखील सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
रमजान ईद पूर्वी संपूर्ण एक महिना मुस्लिम बांधव रोजा अर्थात रमजानचे उपवास करतात आणि या उपवासाची समाप्ती रमजान ईदच्या दिवशी केली जाते. रमजान ईदनिमित्त रायवूड मदिना मस्जिदमध्ये मौलाना असिदुल्ला अलीम यांनी नमाज पठण केले. तसेच राज्यावर आलेले दुष्काळी सावट दूर होऊदे, या देशाची अखंडता अबाधित राहूदे, अशी अल्लाला साद घातली.
सर्व मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणनंतर एकमेकाला गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा देत सर्व धर्म समभाव व जातीय सलोख्याचे दर्शन घडविले. मुस्लिम बांधवांच्या घरोघरी शिरखुर्मा बनवत मित्र परिवार व नातेवाईक यांना वाटप करण्यात आला. दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.