बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरात कोयते दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या संशयीतांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न तसेच दहशत निर्माण करणे यासह विविध गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल माने, शामवेल जाधव( रा. वसंत नगर बारामती) प्रथमेश मोरे( रा. प्रगती नगर बारामती)यश मोहिते,चैतन्य कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल दि (१७) रोजी सायंकाळच्या सुमारास कोयता गॅंगने बारामती शहरात दहशत माजवली. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात दोन नागरिक जखमी झाले.
हॉटेलची तोडफोड केली. चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यावर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय समोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली. बारामती एमआयडीसी परिसरात देखीलया गँगने धुमाकूळ घातला.