पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मिळकतधारकांची थकबाकी आहे त्यांच्यावर महापालिका जप्तीची कारवाई करत आहे. शहरातील 325 मिळकतधारकांना कर थकविल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर न भरलेल्या तीन मिळकतींवर आज कारवाई करण्यात आली.
चऱ्होली करसंकलन कार्यालयाच्या हद्दीतील बसवंत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे भीमराव बसवंतराव पाटील यांच्या मोकळ्या जमिनीवर 52 लाख 55 हजार रुपये थकबाकी होती. तसेच औद्योगिक मिळकत करापोटी 55 लाख 74 हजार अशी एकूण 1 कोटी 8 लाख 29 हजार 853 थकबाकी होती. निगडी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील गुलशन हॉटेल (तालेरा फोर्ड) या मिळकतीची एकूण रक्कम 57 लाख 55 हजार 756 रुपये भरणा न केल्याने मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये ई क्षेत्रीय अधिकारी अवधूत तावडे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, संजय लांडगे, लक्ष्मण काळे, अतिक्रमण निरीक्षक प्रकाश बाणेकर, बाळू गंधट, राहुल जगताप, संतोष बांदल, भास्कर खंडे, दत्तात्रय कोळसे, श्रीराम भागवत व कैलास कदम यांनी काम पाहिले.
महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने 5 लाखांपुढील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना मिळकत जप्ती पूर्व नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. मिळकत जप्तीची नोटीस मिळूनही जे मिळकतधारक कराचा भरणा करणार नाहीत, अशा मिळकतींवर जप्तीची कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.