कानपूर – उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात मुलीला शोधण्यासाठी पोलीस निरीक्षकाने दिव्यांग आईला लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजपाल सिंह (चकेरी पोलीस स्टेशन) असे लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांच्याविरूद्ध लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनिगवां येथे राहणाऱ्या दिव्यांग महिलेची 15 वर्षाची मुलगी एक महिन्यापासून बेपत्ता आहे. दुरच्या नातेवाईकाने तिचे अपहरण केल्याचा संशय आहे. या संदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली मात्र, जेव्हा महिला विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असे तेव्हा तिला तेथून हाकलून देण्यात येत होते. आरोपीला पोलीसांनी एकदा ठाण्यात बोलावले होते. मात्र, नंतर त्याला सोडून देण्यात आले.
नाविलाजाने लाच देण्याची मागणी स्विकारली –
एके दिवशी इन्स्पेक्टरने महिलेला मुलीचा शोध घेण्यासाठी गाडीत डिझेल भरण्यास सांगितले. त्यांनी ती मागणी स्विकारली. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा त्यांच्याकडून डिझेल भरून घेतले पण मुलीचा शोध घेतला नाही. नाविलाजाने महिलेने डीआयजी डाॅक्टर प्रितिंदर सिंह यांच्याकडे धाव घेतली. महिलेने आरोप केला आहे की, त्यांनी भीक मागून इन्स्पेक्टरच्या गाडीत आतापर्यंत 10 ते 12 हजार रूपयाचे डिझेल भरले आहे.
आरोपी इन्स्पेक्टर निलंबीत, मुलीचा शोध घेण्यासाठी चार पथके तैनात –
पीडित महिलेने म्हटले आहे की, त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसमध्येही तक्रार केली होती. मात्र, तेथेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आता डीआयजी यांनी इन्स्पेक्टरला निलंबीत करून मुलीच्या शोधासाठी पोलीसांची चार पथके तैनात केली आहेत.