मांडवगण फराटा(प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या क्षेत्राचा मेळ घालून 7/12 सदरी अंमल क्षेत्रांत दुरुस्ती करून अतिक्रमणाचा ताबा देण्यासाठी खोटा, बनावट आदेश तयार केला. खातेदाराशी संगनमत करुन आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. याप्रकरणी झालेल्या चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर शिरुर येथील महसूल नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांचे निलंबन करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यादव यांना नुकतीच पदोन्नती मिळून ते तहसीलदार झाले होते; परंतु हा चार्ज घेण्यापूर्वीच त्यांचे निलंबनाची ऑर्डर झाल्यामुळे त्यांना या पदाचा लाभ तुर्तास घेता आलेला नाही.
नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी मांडवगण फराटा येथील जमीन गट नं. 256/1 व 256/2 अनुषंगाने हद्दीबाबत मोजणीमध्ये आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन त्याची अंमलबजावणी पोलिसांमार्फत करणेकरिता खोटा, बनावट आदेश तयार करुन मोजणी खातेदारांशी संगनमत करुन अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई निश्चित होती. त्यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करणे, बनावट खोटे आदेश पारित करणे, नियमबाह्य पद्धतीने कृती करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, कागदपत्रांच्या प्रती गायब करणे इत्यादी अनियमितता केल्याचे निदर्शनात आले. या अनुषंगाने त्यांची निलंबनांतर विभागीय चौकशी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 (1) (अ) मधील प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून यादव यांना 6/7/2021 पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान मांडवगण फराटा येथील तक्रारदार शेतकरी सचिन गोरख जाधव (मुंबईकर) व इतर यांनी पाठपुरावा करुन गोळा केलेली कागदपत्रे आणि केलेल्या उपोषणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलली. अत्यंत कमी वेळेत याचा निकाल लावल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
तसेच दैनिक प्रभातने वेळोवेळी केलेल्या निर्भीड वृत्तांकनांमुळे हे प्रकरण दडपण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. तसेच या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड झाल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. शिरूर तालुक्यात प्रथमच नायब तहसीलदार पदावरील व्यक्तीला निलंबित केल्यामुळे सध्या इतर कामचुकार अधिकाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहेत.