पुणे – लॉकडाऊनच्या साडेसहा महिन्यांनंतर पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात “चला बोलूया’ हे समुपदेशन केंद्र नुकतेच पुन्हा सुरू झाले. यात वैवाहिक स्वरुपाच्या दाव्यांमध्ये पक्षकारांचे समुपदेशन केले जाते.
या केंद्रात मधु गीता सुखात्मे, पूनम निंबाळकर, प्रशांत लोणकर, नयना आठल्ये, दिप्ती जोशी हे समुपदेशक पक्षकारांचे समुपदेशन करणार आहेत. दाखल पूर्व दावे तडजोडीने निकाली काढण्यास यामुळे चालना मिळणार आहे.
करोनापासून बचावासाठी आवश्यक ती सर्व काळजी याठिकाणी घेतली जाणार आहे. पक्षकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी सांगितले, दाखल पूर्व प्रकरणांमध्ये समुपदेशकांच्या माध्यमातून तडजोडीने वाद-विवाद संपुष्टात आणण्यासाठी या उपक्रमामार्फत प्रयत्न केले जात आहेत.