पिंपरी – नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासाठी स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाने एकत्रितपणे काम करावे. कोठेही पावसाचे पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे.
महापालिकेच्या चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयास आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.15) भेट देऊन प्रभाग क्र. 16 आणि 17 मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.
यावेळी आयुक्त म्हणाले की, नागरिकांची विश्वसार्हता हेच आपले बलस्थान असून आपण करीत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण ते करीत असतात. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला ठेऊन प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा .कोणताही मोठा प्रकल्प हाती घेताना त्या कामात इतर विभागांच्या कामाचा भाग येत असतो. अशा वेळी एकत्रितपणे या विभागांनी नियोजन केल्यास अडचणी उद्भवणार नाहीत. कामाचे डिझाइन करताना पुढील 25 वर्षांचा विचार केला पाहिजे. आपल्या कामाबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. नागरिकांची गैरसोय होईल अशी कोणतीही गोष्ट करु नका, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिल्या.
रस्त्यांसाठी भूसंपादन करण्याच्या कामाला गती द्यावी, एम बी कॅम्प येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात यावी, अशा अनेक सूचना नगरसेवकांनी यावेळी मांडल्या. प्रत्येक भागाचा विचार करुन रस्ते आणि चौक सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन आकर्षक वृक्षारोपण करावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. प्रेमलोक पार्क, वाल्हेकरवाडी आदी भागात पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत, त्यामुळे या भागातील पाणी मीटर बसविल्याच्या आकडेवारीसह सर्व कारणांचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. राजेंद्र फिरके यांनी बैठकीत माहिती दिली.