कॅनबेरा :- ऑस्ट्रेलियातून श्रद्धा वॉलकरच्या हत्या प्रकरणासारखे प्रकरण समोर आले आहे. लग्नाला नकार दिल्याने 21 वर्षीय भारतीय नर्सिंग विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने आधी पीडितेचे हात-पाय बांधून अपहरण केले, त्यानंतर तिचा गळा चिरून तिला जीवंतच जमिनीत गाडले होते.
अधिक माहितीनुसार, आरोपी पीडितेचा माजी प्रियकर होता. तो तिला बऱ्याच दिवसांपासून त्रास देत होता. बुधवारी ऑस्ट्रेलियन कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान या गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जास्मिन कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती ऍडलेड शहरात राहायची. आरोपी तारिकज्यो सिंग याने 5 मार्च 2021 रोजी शहरातील कामाच्या ठिकाणाहून तिचे अपहरण केले. त्यानंतर त्याने तिचे हात-पाय वायरने बांधले आणि तिला कारच्या ट्रंकमध्ये टाकले.
तारिकज्योत जास्मिनला 400 मैल (643 किमी) दूर असलेल्या रिमोट फ्लिंडर्स रेंजमध्ये घेऊन गेला. तिथे निर्जन जागा पाहून आरोपीने आधी तिच्या गळ्यावर अनेक वार केले. त्यानंतर तिला जमिनीत जिवंत गाडले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाल्याचे न्यायालयात निष्पन्न झाले आहे.
आधी आत्महत्येची माहिती दिली…
गेल्यावर्षी जास्मिनच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तारिकज्येतवर मुलीचा छळ, अपहरण आणि खून केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राथमिक तपासात तारीकज्योतने जास्मिनची हत्या केल्याचा आरोप फेटाळला होता. जास्मिनने आत्महत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
आपणच तिचा मृतदेह पुरला होता, असेही तो म्हणाला होता. मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये खटला सुरू होण्यापूर्वी तारिकज्योतने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने जास्मिनचे सामान आणि मृतदेह कुठे पुरला होता, याचीही माहितीही दिली होती. वस्तू व मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.