- महापालिकेतील प्रकार
- सफाई कंत्राटदारावर कारवाईची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाणी समजून एक व्यक्ती ऍसिड पिल्याची घटना घडली. हा प्रकार महापालिकेत साफसफाई करणाऱ्या ठेकेदारी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याने संबधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे यांच्या कक्षात हा प्रकार घडला. या कक्षात नगरसेवक राजू बनसोडे यांच्यासोबत काही नागरिक कामानिमित्त आले होते. त्यामधील एका नागरिकाने पाणी पिण्यासाठी बाटली घेतली. परंतु, ते पाणी पिल्यानंतर त्यांना त्रास झाला. हे साफसफाईसाठी वापरले जाणारे ऍसिड असल्याचे लक्षात आले. दरम्यान, ऍसिड पिणाऱ्या नागरिकाला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा सगळा प्रकार येथे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे घडला असल्याचे समोर आले आहे. स्वच्छतेसाठी आणलेली ऍसिडची बाटली तेथे ठेवण्यात आली होती. ही घटना गंभीर असल्याने साफसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्यांना ब्लॅकलिस्ट करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.