पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा पाचशेच्या खाली आली आहे. आज शहरामध्ये नवीन 411 नवीन रुग्णांची भर पडली. तर 1143 रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 27) शहरात 411 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 48 हजार 756 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 33 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 22 व शहराबाहेरील 11 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5965 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 1143 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 39 हजार 871 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6039 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 3296 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1600 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 4896 इतकी आहे.