शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका महिलेशी मैत्री निर्माण करून महिलेवर जादूटोणा करून ढोंगीबाबा सोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तिच्यावर बलात्कार करून मारहाण तसेच गर्भपात केल्याची घटना घडली. पीडितेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असताना आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला. यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेस तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी करून विनयभंग करत पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर शिक्रापूर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. राहुल संजय वाळके (रा. पेरणे फाटा ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित महिलेने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. लोणीकंद पोलिसांनी राहुल वाळकेविरुद्ध बलात्कार, गर्भपात, मारहाण तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. मात्र, आरोपी राहुल वाळके याने न्यायालयातून अटकपूर्व जमीन मिळवला. जामिनावर सुटून आल्यानंतरदेखील रात्री महिला तिच्या घरी असताना “तू लोणीकंद पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे’ असे म्हणून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.