पुणे – कॅम्पातील एका व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातील 5 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. नेट बॅंकिंग खाते हॅक करून सायबर गुन्हेगाराने हा गुन्हा केल्याचे निदर्शनास आले. अविनाश कुलकर्णी (63, रा. सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचे कॅम्प परिसरातील इस्ट्रिटवर ट्रेडिंग फर्म आहे. त्यांचे “एनकेजीएसबी’ सहकारी बॅंकेत खाते आहे. दरम्यान, दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ऑफिसमध्ये बसलेले होते.
दरम्यान, सायबर गुन्हेगाराने त्यांचे नेट बॅंकिंगचे खाते हॅक केले तसेच त्याद्वारे तीनवेळा अनधिकृतपणे व्यवहार करीत खात्यातील 5 लाखांची रक्कम काढून घेतली. बॅंक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले हे करीत आहेत.