नवी दिल्ली : रिझर्व बॅंकेने येस बॅंकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणल्यामुळे त्या बॅंकेच्या खातेदारांमध्ये आपल्या ठेवी सुरक्षित राहण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. येस बॅंकेतून आपले पैसे काढण्यासाठी खातेदारांनी आज “एटीएम’पुढे रांगा लावल्या.
मात्र बहुतेक “एटीएम’मध्ये रोख रकमेचा खडखडाट झाल्यामुळे खातेदारांची निराशाच झाली. येस बॅंकेवरील रिझर्व बॅंकेच्या निर्बंधांमुळे ग्राहक 3 एप्रिल पर्यंत 50,000 पेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत.
तथापि, येस बॅंकेच्या शाखांमधील धनादेशाद्वारे 50 हजार रुपये इतकी निश्चित रक्कम काढू शकल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले. नेट बॅंकिंग सेवा कार्यरत नसल्यामुळे ग्राहकांनाही अडचणी येत आहेत आणि क्रेडिट कार्डही काम करत नसल्याची तक्रार काहींनी केली आहे.
धनादेशांद्वारे बॅंकेतून रक्कम काढण्यातही अडचणी येत असल्याचे मध्य दिल्लीतील काही शाखांमधील काही ग्राहकांनी सांगितले.
गाझियाबाद येथील “एटीएम’ बाहेर येस बॅंकेच्या ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या पण “एटीएम’मध्ये रोख रक्कमच नसल्याने काही उपयोग झाला नाही. बहुतेक “एटीएम’मध्ये रोख रकमेचा तुटवडा झाल्यामुळे ग्राहकांची निराशाच झाली.
बऱ्याच ठिकाणी नागरिकांना “एटीएम’मधून 3 ते 4 हजार रुपयेच काढता आले. उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे काढायला लागली.
“आरबीआय’कडून पुढील आदेश येईपर्यंत येस बॅंकेचे चेक क्लिअर केले जाणार नाहीत, असा फलकच संसद मार्गावरील पोस्ट ऑफिसमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे येस बॅंकेत खाते असलेल्या काही व्यापाऱ्यांची देणी स्थगित केल्याचे छोट्या व्यवसायांसाठी पेमेंट फॅसिलिटेटर इंस्टामोजोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक संपद स्वाइन यांनी सांगितले.
कोणत्याही व्यापाऱ्यांचे पैसे अडकू नयेत यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून व्यापाऱ्यांना येस बॅंकेऐवजी अन्य नोंदणीकृत खात्याचा अवलंब करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी 3 एप्रिल पर्यंत घाबरून जाऊ नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न येस बॅंक करत आहे, से येस बॅंकेचे प्रशासक प्रशांत कुमार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.