पारनेर: खासदार सुजय विखे पाटील यांना सुरक्षा देणाऱ्या वाहनास गारखिंडीच्या घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक बालाजी पदमने व इतर पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
खासदार विखेंच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असणाऱ्या श्वानपथकाच्या गाडीला हा अपघात झाला आहे. जखमी पोलिसांपैकी एका पोलिसाला जास्त दुखापत झाली असून, इतर 4 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्वतः खासदार डॉ.सुजय विखे, डॉ.भाऊसाहेब खिलारी यांनी जखमी पोलिसांवर प्रथमोपचार केले असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान गोपीनाथ घुले या पिंपळगाव रोठा गावच्या युवकांच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली आहे. घुले यांनी सहकाऱ्यांबरोबर राहुल पाटील शिंदे यांच्या मदतीने तातडीने दोरखंडाच्या साहाय्याने खोल दरीत उतरून सर्व जखमी पोलिसांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने अँबुलन्सद्वारे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.