वडगाव मावळ -पुण्याकडून लोणावळ्याकडे निघालेल्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो महामार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वडगावजवळील जांभूळफाटा येथे शनिवारी सकाळी घडली.
सिद्धार्थ अशोक कांबळे (रा. थेरगाव, पुणे) हा शनिवारी (दि.29) त्याच्या ताब्यातील टेम्पो (क्र. एम एच 25, 8422 ) घेऊन जुना मुंबई पुणे महामार्गावरून लोणावळा येथे जात असताना जांभूळ फाटा येथे त्याचा टेम्पोवरील ताबा सुटून टेम्पो शेजारून जाणाऱ्या दुचाकीवर उलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार छबिनाथ चव्हाण (वय 49, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कामशेत येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.