‘सासवड-जेजुरी’ पालखी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच

बेलसरमधील कदम वस्तीनजीकच्या रस्त्यावरील पुलावरचे लोखंडी कठडे ठरतायेत धोकादायक

पुणे ( खळद प्रतिनिधी ) : सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर बेलसर कदम वस्ती नजीक असणाऱ्या अरुंद पूलावरील लोखंडी सुरक्षा कठडे रस्त्यावर आल्याने हे ठिकाण धोकादायक ठरत आहे. याठिकाणी अपघात सत्र सुरूच आहे. येथील पूल हा अरुंद असून या पुलाला दोन्ही बाजूने लोखंडी संरक्षक कठडे बसवलेले आहेत. हे कठडे तुटल्याने रस्त्यावरील बाजूस आले आहे. त्यामुळे या कठड्याचा अंदाज वाहनचालकाला येत नाही, परिणामी अपघात होत आहेत, मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, आज याच लोखंडी कठड्याला बारामतीला जाणारे दुचाकीस्वार धडकले. यामध्ये दोन युवक किरकोळ जखमी झाले. तर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मारुती स्विफ्ट कार या कठड्याला धडकून रस्त्यावर आली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गाडीतील एअर बॅग ओपन झाल्याने दोघेजण बचावले. त्यांना स्थानिक ग्रामस्थ वृत्तपत्र विक्रेते मनेर भैया, संतोष कदम, संदीप कदम यांनी मदत केली. त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तालुक्यातील रूग्णालयात पाठवले.

एक महिन्यापूर्वी याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये हे कठडे रस्त्यावर साईड पट्टीच्या आत आले असून त्याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला असून या ठिकाणी रोज एक अपघात होत आहे. कठड्याच्या बाजूला पंचवीस ते तीस फूट खोल विहीर व ओढा आहे. त्यामुळे अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने या कठड्यांची त्वरीत दूरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व प्रवाशांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×