भरधाव कारने दोघांना उडवले ; फुरसुंगी रस्यावरील घटना
पुणे,दि.14- भरधाव कारने एका रिक्षा चालकासह दोघांना उडवल्याची घटना फुरसुंगी येथील आयबीएम कंपनीसमोर घडली. रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला मारहाण करुन कारच्या काचा फोडल्या. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रविंद्र दादासाहेब खेसे (48,रा.भोसले गार्डन, हडपसर)याला ताब्यात घेतले आहे.
नंदकुमार कुंडलीक कपाळे(42,रा.गाडीतळ, हडपसर) व कृष्णा नारायण समन (29,रा.हडपसर) अशी जखमींची नावे आहेत. कार चालक खेसे हा दारूच्या अंमलाखाली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्याच्या रक्ताचे नमूने पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत. यातील दोघाही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायंकाळी रस्त्यावरील वाहतूक कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.