प्योंगयांग- उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्याबद्दल सातत्याने बातम्या येत असतात. मात्र हा हुकुमशाह किती घातकी आणि क्रूर आहे याचा खुलासा करणारेच एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अमेरिकेतील शोध पत्रकार बॉब वुडवर्ड यांनी हे पुस्तक लिहिले असून प्रकाशन होण्याच्या अगोदरच त्याची जोरात चर्चा सुरू आहे.
किम अत्यंत क्रूर आणि कृतघ्न आहे. आपण केलेले नियम कोणी मोडले तर अत्यंत कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा त्याचा नियम आहे. नियम मोडणारा त्याच्या जवळचा अथवा रक्ताचा नातलग जरी असला तरी त्याला क्षमा नाही. त्याच्या सख्ख्या काकाची त्यांनी किती निर्घृणपणे हत्या केली याचा खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे.
किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सूत्रे जेव्हा हातात घेतली तेव्हा सुरूवातीच्या काळात त्यांचे काका जंग साग थाक यांनी त्यांना खूप मदत केली होती. किंबहुना त्यांच्या मदतीमुळेच सरकारवर आपला अंकुश प्रस्थापित करण्यात किम जोंग यांना यश आले होते. मात्र नंतर जंग साग यांच्या काही सुधारणावादी विचारांमुळे आणि काही बाबींतील उदार मतवादी धोरणामुळे किम जोंग यांच्या मनात संशय उत्पन्न झाला व त्यानंतर वितुष्ट आले. अगोदर जंग साग यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
जंग साग यांचे धड शरिरापासून वेगळे केले केले व नंतर ते त्यांच्या छातीवर ठेवले गेले. नंतर त्यांचा हा मृतदेह वरिष्ठ अधिकारी आणि सल्लागारांच्या बैठकीत प्रदर्शनासारखा ठेवला गेला. दहशत निर्माण करणे हाच त्यामागे उद्देश होता.
आपल्या काकाचीच हत्या करण्याच्या या कृत्यामुळे उत्तर कोरियाच्या अधिकारी वर्गात आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. मात्र क्रूरकर्मा किम जोंग याचा भेसूर चेहरा ज्ञात असल्यामुळे सगळे गप्प होते.
बॉब वुडवर्ड यांच्या दाव्यानुसार जेव्हा जंग साग यांच्या हत्येबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगण्यात आले तेव्हा आपल्याला सगळे माहित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. उलट आपण किम जोंग यांच्यापासून प्रभावित झालो असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत काही उलट सुलट बातम्या येत आहेत. मात्र त्यांची प्रकृती चांगली असल्याचे व त्यांना कमी लेखू नका, असा सल्ला देणारे ट्वीटही ट्रम्प यांनी केले आहे.
पत्रकार वुडवर्ड यांनीच अमेरिकेतील कुख्यात वॉटरगेट स्कॅंडल उघडकीस आणले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या सरकारला त्याचा जोरदार हादरा बसला होता. 2018 मध्ये फियर: ट्रम्प इन व्हाइट हाउस हे पुस्तक त्यांनी लिहिले असून त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यांच्या या आगामी पुस्तकाबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे.