भारतीय पुरातत्व विभागाच्या अध्यादेशानुसार कार्यवाही
जुन्नर -ग्रामीण भागातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी किल्ले शिवनेरी, लेण्याद्री व ओझर या जुन्नर तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय पुरातत्व विभागाने प्रसिद्ध केले असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
केंद्राकडून भारतातील सर्वच राष्ट्रीय स्मारके या कालावधीत बंद करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले यांनी दिली. या निर्बंध घातलेल्या कालावधीत मंदिरातील दैनंदिन पूजा व इतर विधी नित्यनियमाने होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या सुट्ट्यांच्या काळात शिवनेरी व लेण्याद्री येथे लाखो पर्यटक येत असतात; मात्र या करोनोमुळे येथील छोटे व्यावसायिक, हॉटेल्स, डोलीवाले व पर्यटकांशी निगडित व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
राज्याच्या शहरी भागांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या करोनाला वेळीच थोपविण्यासाठी ग्रामीण भागांत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यानुसार लेण्याद्री व ओझर या भाविकांची गर्दी होणाऱ्या मंदिरात दर्शनबंदी, किल्ले शिवनेरीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद, सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्ट्या, थिएटर बंदी तसेच संशयित रुग्णांची शोधमोहीम आदी जोरदार मोहिमा आरोग्य व तहसील विभागाने उघडल्या आहेत.
तालुक्यातील किराणा मालाची दुकाने, दूध व भाजीपाला केंद्र तसेच औषधालय वगळता इतर व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याबाबत जुन्नर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. तर सर्व मंगल कार्यालये या मुदतीत बंद ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, बेल्हे, मढ, राजुरी, निमगाव सावा, आळे याठिकाणी भरणारे आठवडे बाजार 13 मार्चपासून बंद करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसिलदार सचिन मुंढे यांनी सांगितले आहे.