नगर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील महत्वाच्या शिर्डीच्या साईबाबा, शनिशिंगणापूरचे शनैश्वर, देवगड येथील दत्त व मोहटा देवीचे दर्शन भाविकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी असणाऱ्या या देवस्थानच्या विश्वस्तांनी आज हा निर्णय जाहीर केला.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज दुपारी 3 नंतर साईमंदिर बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मंगळवारी घेतला. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे.
यापूर्वी 1941 साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते. 79 वर्षापूर्वीच्या निर्णयाची आजच्या निर्णयाने पुनरावृत्ती होत आहे. ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मंगळवारी दुपारी तीननंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आले. शिर्डीत असलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी प्रसादालय सुरू ठेवण्यात आले. उद्या नास्ता पाकिटे सुरू राहतील. भक्तनिवासही उद्या सकाळपर्यंत रिकामी करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे, रमेश उगले, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, संरक्षण प्रमुख गंगावणे, आयटी प्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
राज्यातील सिध्दीविनायक, तुळजापूर, कोल्हापूर, ज्योतिबांचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साईबाबांचे दर्शन घेणाऱ्यांच्या संख्या या काळात कमी होत नाही. काल सुमारे 20 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्याच धर्तीवर आता शिर्डीतील साई मंदिराचा भक्तांचा प्रवेश करण्याचा बंद निर्णय काही काळासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर साई मंदिरातील धार्मिक कार्यक्रम बंदच्या काळात होणार आहेत. मात्र साई मंदिरातील काकड आरती, माध्यान्ह आरती, धुपराती, शेजारती होणार आहेत. त्याचप्रमाणे गुरुवारी निघणारी बाबांची पालखी मात्र मंदिरातील पुजारीच काढणार आहे. यात कोणत्याही भक्तांना सामिल केले जाणार नाही. तसेच मंदिरात होणारे सत्यनारायण पूजा, अभिषेक पूजा बंद करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे यंदा होणारी रामनवमी उत्सव साजरा केला जाणार की नाही याबाबत प्रशासनाने खुलासा केलेला नाही. तसेच साई भक्त प्रसादालय, भक्तनिवास ही बंद करण्यात आले आहेत. शासनाचा पुढील आदेशा मिळेपर्यंत साई मंदिराचे प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय साई बाबा विश्वस्त मंडळाने हा निर्णय केला आहे. साथीचा फैलाव टाळण्याच्या दृष्टीकोनातून व भाविकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून सामाजिक भान जपत मंदिर पुढील निर्णय होईपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत जगभरातील 38 देशांतील 626 भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे. यात करोनाच्या विळख्यात सापडलेल्या चीन, इटली व स्पेनसह 21 देशातील 286 भाविकांचा समावेश आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवारचा आठवडेबाजार, मॉल, वॉटरपार्क, साईतीर्थ थीमपार्क, साईहेरीटेज व्हिलेज (जुनी शिर्डी) जीम, बंद ठेवण्यात आल्या आहेत.
देवगडचे दत्त मंदिर बंद करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देवगडचे दत्त मंदिर, संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी संस्थानच्या वतीने देण्यात आली.
किसनगिरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने 16 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये सप्ताहाचे अत्यंत अत्यल्प प्रमाणात नियोजन केलेले होते. तथापि सद्यस्थितीमध्ये करोना विषाणूंच्या संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच महाराष्ट्रातील विषाणूबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मंदिर करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थान प्रशासनाने नियोजित पुण्यतिथी कार्यक्रम पूर्णत: रद्द केलेला आहे. संस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, उपहारगृहे, इतर दुकाने तथा मंदिर प्रवेश पुढील प्रशासकीय आदेशापर्यंत बंद ठेवलेली आहेत. श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनार्थ येणाऱ्या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र देवगड येथील गर्दी नियंत्रणासाठी संस्थान व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिशिंगणापूरचे शनैश्वर मंदिर बंद
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून शनीदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शनैश्वर देवस्थान प्रशासनाकडून निर्णय जाहीर करण्यात आला. भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी शनीदेवाची पूजा, आरती तसेच दैनंदिन विधी नियमित सुरू असणार आहे. करोनाचा फैलाव टाळण्यासाठी धार्मिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले होते.
सोमवारपासूनच शनीभक्तांची गर्दी कमी झाली होती. दर्शन बंदीमुळे मात्र भाविकांबरोबर, व्यावसायिकतेवर करोनाची साडेसाती लागली आहे. मंगळवारी सकाळपासून पूजा साहित्य दुकानावर, हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानावर शुकशुकाट दिसून येत होता.