- पुढील आदेशापर्यंत प्रवेश नाही
- खराळवाडी, दिघी रोड, संभाजीनगरचा समावेश
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या 44 वर पोहचली आहे. त्यातील पहिले 12 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असले तरी अद्याप शहरात 31 रुग्ण करोना विषाणूने बाधित आहेत. हे रुग्ण शहरातील गजबजलेल्या भागात सापडल्याने चिंता वाढली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तो भाग महापालिकेच्या वतीने सील करण्यात येणार असून तिथे बुधवारी रात्रीपासून प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
शहरात मंगळवारी सायंकाळी सहा रुग्ण करोना बाधित सापडले. हे रुग्ण शहरातील गर्दीच्या भागात म्हणजेच खराळवाडी, संभाजीनगर येथील आहेत. त्यामुळे हा परिसर महापालिकेने सील करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील खराळवाडी, दिघी रोड भोसरी, गव्हाणे वस्ती भोसरी व संभाजीनगर या परिसरात बुधवारी रात्री अकरा वाजल्यापासून प्रवेशबंदी आहे.
या दरम्यान येथील परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच परिसरातील कोणाला बाहेर जाण्याची परवानगी नसेल. नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठीही बाहेर पडण्यास परवानगी नसेल. नागरिकांनी घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक केले आहे.
दरम्यान आज दिवसभरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत. तिथे 43 हजार 595 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बाहेरुन आलेले नागरिक व सर्दी सारखी लक्षणे आढळलेल्या 64 जणांना होम क्वॉरंटाईन केले आहे. तसेच 75 संशयति रुग्णांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्राव एनआयव्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
दरदिवशी होणारी वाढ चिंताजनक
पिंपरी चिंचवड शहरात 8 एप्रिल पासून सातत्याने करोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. 8 ते 15 एप्रिल दुपारपर्यंत शहरात तब्बल 20 नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी 24 तासात आठ करोना बाधित रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे.