दीड किलोमीटर लांबीचे खोदकाम पूर्ण
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन बोगदे, आठ पदरी नवीन रस्ता
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधणीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मागील एक महिन्यांपासून या कामाने पुन्हा गती घेतली असून दीड किलोमीटर लांबीचे खोदकाम पूर्ण झाले आहे.
एमएसआरडीसीने हे काम हाती घेतले आहे. हे बोगदे सुमारे 9 किलोमीटर लांबीचे असून आठ पदरी असणार आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा कि.मीने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ (बीओटी) या तत्त्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने 1999 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मी च्या राहिलेल्या मिसींग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 कि.मी. वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट इथे संपणार आहे.