रेडा -इंदापूर येथील दूधगंगा दुधसंघाकडे दूध घालणाऱ्या उत्पादकांना विक्रमी दर मिळत आहे. म्हशीच्या दुधाला गुरूवारी (दि.25) प्रति लिटरला 62 रुपये असा समाधानकारक दर मिळाला आहे. दर मिळण्याचे एकमेव कारण दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ व आंतरराष्ट्रीय दूध व्यवसायाचा ब्रॅंड ठरलेले अमूल यांच्या करारामुळे इतिहासात प्रथमच विक्रमी दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.
दूधगंगा संघाकडून गायीच्या दुधाला 25 रुपये प्रतिलिटर प्रमाणे हमीभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार 26,27 रुपये असाही दर मिळत आहे. दूधगंगा संघाकडून दुधाला सर्वात जास्त दर मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
झाले आहे.
दूधगंगा संघाने नावाजलेल्या अमूल बरोबर नुकताच करार केला आहे. दि. 8 जून पासून दूध संकलन सुरु झाले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे प्रत्येकी दहा दिवसांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा केली जात आहे. दूधगंगा संघ हा तालुक्यातील एकमेव सहकारी दूध संघ आहे. या दूध संघाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य, वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत.- हर्षवर्धन पाटील,संस्थापक दूधगंगा