निकालानंतर संभाव्य बहुमतासाठी चाचपणी सुरू
डेहराडून -उत्तराखंड मध्ये प्रत्यक्ष मतमोजणीच्या आधीच तेथील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात निकालाच्या आधीच मोठ्या प्रमाणात सुंदोपसुंदी सुरू झाल्याने पक्षाचे वरीष्ठ नेते चिंताग्रस्त झाले आहेत.
आपसातील टिका थांबवण्याच्या सूचना भाजपच्या उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्या तरी संभाव्य निकाल विरोधात जाण्याच्या शक्यतेने भाजपच्या नेत्यांनीच एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार हरिष रावत हेही विद्यमान स्थिती बाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत.
भाजपचे रणनीतीकार कैलाश विजयवर्गीय रविवारी उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे आले होते. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी उत्तराखंड मधील संभाव्य राजकीय स्थिती बाबत चर्चा केली. त्यांनी पक्षाच्या कामगिरीचाही आढावा घेतला. त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि प्रदेश भाजप अध्यक्ष मदन कौशिक यांच्याशीही चर्चा केली.
उत्तराखंडचे पक्षाचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांचीही एक महत्त्वाची बैठक आज झाली. बहुमत हुकल्यास ते प्राप्त करण्याची रणनिती निश्चीत करण्यासाठी भाजपचे नेते सध्या व्यस्त आहेत. उत्तराखंड मध्ये सपा, बसपा आणि अन्य अपक्षही काही ठिकाणी विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही भाजपने हाती घेतला आहे.