पुणे – राज्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी, शिक्षकांसाठी आता सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांची शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) उपलब्ध करून दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा सुरु झालेल्या नाहीत. आरोग्य व दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न असणाऱ्या असंख्य बालकांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये व शिक्षणाशी, शिक्षकांशी त्यांचा संबंध तुटू नये यासाठी “शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ असा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यांतर्गत पहिल्या टप्प्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे शैक्षणिक कॅलेंडर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पुढील तीन महिन्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे.