जिल्हा परिषदेकडून निधी देण्यास नकार ः हवेलीकरांकडून तीव्र नाराजी
लोणी काळभोर (पुणे) – जिल्हा परिषदेने येथील कोविड केअर सेंटरला पैसे देण्यास नकार दिल्याने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सेंटर बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली आहे. राज्य सरकारसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा व राजकीय नेते यांनी सुरुवातीपासूनच पूर्व हवेलीकडे दुर्लक्ष केल्याने या सर्वांच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे.
पूर्व हवेलीत मागील दहा दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. येथील विश्वराज हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटर बंद पडल्याने नागरिकांना उपचारासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर बंद पडल्याने, पूर्व हवेलीमधील रुग्णांना उपचारासाठी थेट नऱ्हे, वाघोली अथवा हिंजवडीसारख्या पुण्याच्या दुसऱ्या टोकाला जावे लागणार आहे.
जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने 9 जूनला विश्वराज हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले होते. या सेंटरमुळे मागील तीन महिन्यांच्या कालावधीत 900 रुग्णांना उपचार मिळाले आहेत. मात्र कोविड सेंटर सुरु झाल्यापासुन जिल्हा परीषदेने या कोविड केअर सेंटरसाठी एक रुपयाचाही निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या प्रशासनाने 23 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा कोविड केअर सेंटरला मदत करण्यास नकार दिला होता; मात्र खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे 27 ऑगस्टला आरोग्य विभागाने वरील कोविड सेंटर सुरु केले होते. त्यानंतरही जिल्हा परिषदेने निधी देण्याबाबत हात वर केल्याने, हे कोविड सेंटर कायमस्वरुपी बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली आहे.
डॉ. रखमाबाई राऊत योजनेची मुदत संपल्याचे माहित असतानाही, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या योजनेच्या माध्यमातून निधी पुरवण्याच्या अटीवर विश्वराज हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यास विश्वराज हॉस्पिटल प्रशासनाने परवानगी दिली होती. योजनाच चालू नसल्याने, कोविड सेंटरच्या खर्चाची रक्कम संबधित रुग्णालयाला देता आलेली नाही. यामुळे वरील कोविड सेंटर बंद करण्याशिवाय आरोग्य विभागासमोर पर्याय नाही.
- निधीअभावी लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटर बंद करावे लागले ही बाब खरी आहे. मात्र पूर्व हवेलीमधील नागरिकांच्या सोयीसाठी लोणी काळभोर येथे नवीन कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेने कोविड सेंटरसाठी जागा देण्याचे मान्य केले असून, पुढील काही दिवसांत आरोग्य विभागच कोविड सेंटर सुरू करणार आहे.
-प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी हवेली