पुणे – करोना संकटात आरोग्यासोबत विद्यार्थ्यांचे शिक्षणही महत्त्वाचे आहे. विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक दिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती केली असून ते संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सध्या जून ते ऑगस्ट या महिन्यांसाठी दिनदर्शिका उपलब्ध करून दिली आहे.
जुलैपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत डिजिटल शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हे शैक्षणिक कॅलेंडर तयार केले आहे. इयत्ता पहिली ते दहावीसाठी एकूण 270 पानांचे महत्त्वपूर्ण हे कॅलेंडर आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी या कॅलेंडरचा वापर करून शिक्षण घेऊ शकणार आहेत. यात अध्ययन पुरक साहित्य, कृती, स्वाध्याय यांचा समावेश आहे. दीक्षा, रेडिओ, टेलिव्हिजन, अध्ययन, व्यवस्थापन प्रणाली या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
शिक्षकांची जबाबदारी
– शैक्षणिक कॅलेंडर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.
– विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करावे लागणार.
– शिक्षक-विद्यार्थी संबंध दृढ व्हावेत.
– ई-साहित्याचा अधिकाधिक वापर करावा
– कृती व उपक्रमावर भर द्यावा.
– पुस्तकांच्या वापराबाबत माहिती देणे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
– दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्यावी.
– शिक्षकांनी पाठविलेल्या चाचण्या सोडवाव्यात.
– ई-साहित्य वापराताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यातच राहावे.
– थोडी विश्रांती घेत ई-साहित्य पाहावे.
– नवीन पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा.
– स्वाध्याय पूर्ण करून ज्येष्ठांकडून तपासून घ्यावा.
संपूर्ण वर्षासाठी शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्याचे काम सुरू आहे. आता आवश्यतेनुसार तीन महिन्यांचे तत्काळ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी हिताचा विचार करूनच हे तयार केले आहे. शैक्षणिक सुट्ट्यांचे नियोजन करून त्याचा समावेश कॅलेंडरमध्ये करण्यात येणार आहे. या कॅलेंडरद्वारे विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता येणार आहे.
– दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे