पुणे – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व युनिसेफ यांच्या वतीने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाकरिअर पोर्टल सुरू केले आहे. याच्या वापराविषयी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांना माहिती व्हावी यासाठी 31 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर या कालावधीत वेबिनार घेण्यात येणार आहे.
करिअर पोर्टल, करिअरचे पर्याय, महाविद्यालये, प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्तीचे सत्र, विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रश्न याबाबत 31 ऑगस्ट रोजी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यावसायिक व डिप्लोमा देणारे करिअर व त्याची व्याप्ती यावर 7 सप्टेंबर रोजी, तर शाळेनंतर काय यावर 14 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
“शिक्षण आणि अध्यापनात करिअरचे पर्याय’ याविषयी 21 सप्टेंबर रोजी, तर डॉक्टरांच्या व्यतिरिक्त जीवशास्त्रातील करिअरचे पर्याय यावर 28 सप्टेंबर रोजी प्रशिक्षण मिळणार आहे.
इयत्ता नववी व दहावीमधील 1 शिक्षक, इयत्ता अकरावी व बारावीमधील 1 शिक्षक अशा दोन शिक्षकांना वेबिनारच्या प्रत्येक सत्रात दुपारी 3 ते 4 या वेळेत उपस्थित राहण्यासाठी शाळांना सूचना द्याव्यात.
वेबिनार युट्युबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांना स्पष्ट केले आहे.