कामशेत येथील वसतिगृहातील प्रकार : मुलाला आई-वडील नसल्याने नातेवाईकांनी ठेवले होते शाळेत
कामशेत – कामशेत येथील एका इंग्लिश मिडीयम शाळेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलावर शाळेच्या केअरटेकरने धमकावत अनैसर्गिक कृत्य केल्याची फिर्याद मुलाच्या आत्याने दिली आहे. पीडित मुलाला आई – वडील नसून त्याच्या नातेवाईकांनी त्याला शिक्षणासाठी शाळेत ठेवले होते.
शहराच्या बाहेर असलेल्या कामशेत इंग्लिश स्कूल अँड बोर्डिंग या शाळेत 10 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान दोन वेळा या मुलावर लैंगिक अत्याचार केले. शाळेचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांनी पीडित मुलाच्या नातेवाईकांना फोन करून तुमच्या मुलावर अत्याचार झाला असल्याचे सांगितले. मात्र हा प्रकार शाळेच्या बाहेर झाला आहे, ही बाब तुम्ही कोणाला सांगू नका. त्यामुळे नातेवाईक मुलाला मुंबई येथे घेऊन गेले. काही दिवस तो शांत व कोणाशी काही बोलत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला काही विचारले नाही. पण तो थोडा सावरल्यानंतर त्याने सर्व प्रकार सांगितला.
यावेळी नातेवाईकांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ची मदत घेतली असता सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या शोभा महासिद्ध बशेट्टी ह्यांनी त्यांच्या घरी जावून विचारपूस केली. शिवाय घडलेला प्रकार खरा असल्याची खात्री पटल्यानंतर नातेवाईक फिर्यादी व त्यांचे इतर नातेवाईक यांच्यासह सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. ती कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून याप्रकरणी शाळेतील बोर्डिंगचे केअरटेकर रसूल सैफन शेख ( वय 32, रा. अहिरवडे, मावळ ) व स्कूलचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रसूल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.