पणजी – चित्रपट मुळात विशिष्ठ धाटणीतले म्हणून तयार केले जात नाहीत मात्र चित्रपटांच्या प्रसारादरम्यान तो विशिष्ठ धाटणीतला असल्याचे माध्यमांकडून दर्शवले जाते, असे मत प्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक तकाशी मिक यांनी व्यक्त केले आहे. ते 50 व्या इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘फर्स्ट लव्ह’ या आपल्या नव्या चित्रपटाबाबत त्यांनी सांगितले. ‘याकुझा’ टोळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही प्रेमकथा आहे. याकुझा या जपानी गँगस्टरवर चित्रपट करण्याची बऱ्याच काळापासूनची इच्छा होती, असे तकाशी यांनी सांगितले. या चित्रपटातून कुठलाही विशेष संदेश देण्याची इच्छा नाही. प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटतो, ते महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.जीवनाचा आनंद घ्या आणि त्यातून शिका, असा सल्ला तकाशी यांनी उदयोन्मुख चित्रपटकर्त्यांना दिला. जीवन बदलत असते. त्या अनुभवांचा वापर चित्रपट निर्माण करताना करा असे त्यांनी सांगितले.
फर्स्ट लव्ह चित्रपटाचा सारांश…
टोकियोमध्ये एका रात्री तरुण मुष्टीयोद्धा लिओ आणि वेश्या मोनिका अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटमध्ये अडकतात. मोनिकाजवळ कोकेन असल्याचा संशय असतो. भ्रष्टाचारी पोलिसाच्या तावडीतून पळताना लिओ तिच्या मदतीला येतो. विनोदी आणि मारपीट धाटणीचे मिश्रण या चित्रपटात आहे.