अबाऊट टर्न : साखळी

– हिमांशू

देशातल्या आणि राज्यातल्या राजकारण्यांना आणि अन्य टीआरपीग्रस्तांना करोनाचे आणखी किती बळी हवे आहेत? असे खडसावून विचारण्याची वेळ खरे तर आली आहे; पण विचारणार कोण? हा प्रश्‍न एकीकडे सगळेच एकमेकांना विचारतायत आणि दुसरीकडे कुणीच कुणाला विचारेनासं झालंय. राजकारण नेमकं कोण करतंय, हे यथावकाश लोकांना समजतं; परंतु हल्लीच्या विचित्र वातावरणात एका गोष्टीचा उलगडा होईपर्यंत दुसरा गुंता लोकांसमोर टाकायला राजकारणी मंडळी चांगलीच शिकली आहेत. जुन्या कोणत्याही वादाची आठवण होणार नाही याची काळजी, नवनवीन तमाशे उभे करून घेतली जात आहे. अगदी दोन-चार वर्षांपूर्वीच्या गोष्टीही आपल्या विस्मृतीत जात आहेत. 

हा “शॉर्ट टर्म मेमरी लॉस’च आपल्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार आहे. लॉकडाऊन जाहीर करायचा की नाही, येथपासून लसींच्या उपलब्धतेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर केंद्र विरुद्ध राज्य बखेडा निर्माण करून संबंधितांना काय साध्य करायचं आहे? राज्यात वीकेन्ड लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्याला विरोधही झाला. मोठा लॉकडाऊन लावायचा की नाही, याबाबत सर्वपक्षीय बैठक झाली; परंतु दुर्दैवानं या बैठकीत एकमत होऊ शकलं नाही. कोणी काय मुद्दे मांडले याचं जे विवेचन समोर आलं, त्यालाही राजकारणाचा वास होता. लॉकडाऊन देशात लागू करणं आणि राज्यात लागू करणं यात फायद्याचं किंवा तोट्याचं काय असणार? तरीही जिभा सुटलेल्याच आहेत!

आजमितीस लॉकडाऊन कुणालाच नकोय आणि ते स्वाभाविकच आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी अनेकांनी बरंच भोगलंय. कुणी रोजगार गमावलाय, तर कुणाचं उत्पन्न आटलंय. “उपाशी मरण्यापेक्षा कोविडने मरू,’ असे काहीजण बाणेदारपणे म्हणताना दिसतायत; पण ज्यांच्या घरातल्या कर्त्याचा कोविडमुळे मृत्यू झालाय, त्या घरात डोकावलं तर त्यांचंही मत बदलू शकेल. लॉकडाऊनची वेळ येण्याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे कोविडचा प्रसार कसा, किती होतो, याबाबत अजून जगाला फारसं ठाऊकच नाहीये. रुग्णसंख्या अचानक वाढल्यावरच लाट वगैरे आल्याचे समजते आणि धावपळ सुरू होते. दुसरे कारण म्हणजे, साधेसुधे दोन-तीन नियम आपण व्यवस्थित पाळत नाही.

जेव्हा शत्रू अनोळखी असतो तेव्हा ज्ञात असलेली सगळी शस्त्रे उपयोगात आणली पाहिजेत. जीवनशैलीत बदल करा, असेच हा विषाणू आपल्याला सांगतोय आणि आपल्याला ते समजत नाहीये, म्हणून तो वाढतोय. एखाद्या राज्यात मोठी लाट येते, एखाद्या राज्यात ती लहान असते. पण दोन्ही राज्ये याच देशातली आहेत, असे किमान वाटायला नको का? जे घरात बसून टीव्ही बघतायत, त्यांची करमणूक नेतेमंडळी जरूर करतील; पण सर्वस्व गमावलेल्यांना या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची शिसारी आल्याखेरीज राहणार नाही.

निवडणुका आणि त्यासाठीचे राजकारण यात होत चाललेले बदल केवळ खेदजनक नव्हे तर किळसवाणे आहेत. पूर्वी निवडणूक आली, खेळली, जिंकली किंवा हरली आणि लगेच विस्मृतीत गेली, असे वातावरण असायचे. आता राजकीय पक्ष 365 दिवस, 24 तास सतत “युद्धसज्ज’च असतात. मग प्रत्येक गोष्टीचे राजकारण झाल्याखेरीज राहील का? एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या घटना-वक्‍तव्यांची साखळी करोनाच्या साखळीमुळे तुटेल असे वाटत होते. पण करोनाच्या साखळीपेक्षाही राजकारणाची साखळी अधिक जीवघेणी ठरली, हेच दुर्दैव!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.