गर्दीतही विनामास्क व्यक्‍ती येणार ‘नजरेत’

"आर्टिफिशल इंटेलिजन्स'ची मदत : पुण्याल ऋचा पेंडसेकडून "मास्क डिटेक्‍शन' यंत्रणा विकसित

पुणे  (गायत्री वाजपेयी ) – गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता फिरणारे नागरिक स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्‍यात घालतात. मात्र, गर्दीत अथवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना ओळखणे अवघड जाते. याच समस्येवर उपाय म्हणून पुण्यातील ऋचा पेंडसे हीने आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावर आधारित “मास्क डिटेक्‍शन’ यंत्रणा विकसित केली आहे. याच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या सहाय्याने मास्क न घालणाऱ्या व्यक्‍तीस गर्दीतही सहजपणे ओळखता येऊ शकते.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही काही नागरिक मास्क वापरत नाही आणि वापरलाच तर तो योग्यप्रकारे लावला जात नाही. यामुळे गर्दीतील अशा व्यक्‍ती ओळखण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या ऋचा हीने हे आव्हान स्वीकारत, आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित एक यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी तिने विविध कोडिंग प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने डाटासेटस मिळविले आणि त्याआधारे ही यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले.

पुण्यातील प्रभात रस्ता येथे राहणाऱ्या ऋचाने आयआयटी गुवाहाटी येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा मोटर्स येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम केलेल्या ऋचाने आपली गणिताची आवड जोपासण्यासाठी कोडिंग संदर्भातील विविध ऑनलाइन कोर्सेस केले. त्यानंतर तिने नोकरी सोडून स्वत:चे प्रोजेक्‍ट घेण्यास सुरवात केली आहे.

पोलिसांसाठी सर्वाधिक उपयुक्‍त यंत्रणा
सध्या शहरात पोलिसांकडून मास्कसंदर्भात कारवाई होत आहे. मात्र अनेकदा कारवाईसाठी अनेक व्यक्‍तींच्या संपर्कात आल्याने पोलीसही बाधित होण्याची भीती असते. अशावेळी या यंत्रणेच्या सहाय्याने शहरातील सिग्नलवर असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस अशा व्यक्‍तींवर कारवाई करू शकतील. यामुळे नागरिकांशी थेट संबंध न येता, त्यांच्यावर कारवाई करणे शक्‍य होणार असल्याने ही यंत्रणा पोलीस दलासाठी उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास ऋचा हिने व्यक्‍त केला आहे.

अशी काम करते यंत्रणा
“ए आय’ आधारित मास्क डिटेक्‍शन यंत्रणा विकसित करण्यासाठी ऋचाने विविध डाटासेटसच्या सहाय्याने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये सुमारे 800 ते 900 विविध फोटो देण्यात आले असून, यामधील घटकांना लेबलिंग केले आहे. तसेच याचा निष्कर्ष बायनरी स्वरुपात मिळतो. त्यानुसार मास्क घातलेल्या व्यक्‍तीसाठी 1, तर न घातलेल्या व्यक्‍तीसाठी 0 असा बायनरी संदेश या यंत्रणेला मिळतो. यामाध्यमातून गर्दीतही मास्क न घातलेला व्यक्‍ती ओळखला जाऊ शकतो, असा दावा ऋचाने केला आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या गरजेनुसार या यंत्रणेत आवश्‍यक बदल करता येतात, असेही तिने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.