अबाऊट टर्न : वाढदिवस

-हिमांशू

तसं पाहायला गेलं तर आपला वाढदिवस रोजच असतो; कारण आपण रोज एकेका दिवसानं वाढतच असतो. कालमापनाच्या सोयीनुसार महिने आणि तारखा अस्तित्वात आल्या आणि ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे आपण तारखेनुसार वाढदिवस साजरे करू लागलो. वाढदिवस साजरा करण्यामागील मूळ संकल्पना आणि ती अस्तित्वात आली तेव्हाचं स्वरूप कसं होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता, सध्याची परिस्थिती पाहून वाटते. 

हल्ली व्हॉट्‌सऍपच्या अनेक ग्रुपमध्ये आपण सामील असतो आणि बऱ्याच ठिकाणी तेच ते चेहरे असतात. या ग्रुपमधल्या एखाद्याचा वाढदिवस असेल तर अनेक ग्रुपमध्ये शुभेच्छांचा पाऊस एकाच वेळी, एकाच व्यक्‍तीवर सुरू होतो. आपण एखाद्या ग्रुपवर अभीष्टचिंतन करावं तर संबंधित व्यक्‍ती आपल्याला नेमकं “लक्षात ठेवते’ आणि आपला वाढदिवस आला की सूड उगवते. समाजमाध्यमांनी एक बरं केलंय. लोकांचा इगो टोकाचा वाढवून ठेवलाय आणि प्रत्येकाला स्वतःचा सोडून इतरांचा इगो दिसेल अशी व्यवस्था करून ठेवलीय.

या आभासी जगात घडणाऱ्या-बिघडणाऱ्या संबंधांचे पडसाद मग वास्तव जीवनातही उमटतात. इतक्‍या सगळ्या भानगडी एकट्या वाढदिवसामुळे होतात. त्यामुळे एकमेकांना क्षणार्धात जवळ आणणारं एकही तंत्रज्ञान नव्हतं तेव्हाच माणसं एकमेकांच्या अधिक “जवळ’ होती असं वाटू लागतं. आठवून पाहिल्यास शुभेच्छापत्र वेळेत पोहोचावं म्हणून आठ दिवस आधीच पोस्टात टाकण्याचे दिवस अधिक उत्साहवर्धक होते असं वाटतं.

कुणी “नॉस्टेल्जिक’ म्हटलं तरी चालेल; पण असंच खूप मागे-मागे जावं… अगदी वाढदिवस साजरा करणं जेव्हा सुरू झालं, त्या काळात जावं असं मनापासून वाटायला लागलंय. रस्त्यावर केक कापण्याचे प्रकार सुरू झाल्यापासून तर ही इच्छा अधिक प्रबळ होत चाललीय. एखादा बर्थडे बॉय तलवारीनं केक कापतो, त्याचे फोटो व्हायरल होतात आणि नाईलाजास्तव त्याला लॉक-अपची हवा खावी लागते, हे दुर्दैवी नाही का? शूरपणाच्या, मर्दपणाच्या कल्पना किती संकुचित झाल्यात!

असाच एक विचित्र प्रसंग आठवतो. एके ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यात मोटारसायकल आडवी लावलेली दिसली. आजूबाजूला कुणीच नव्हतं. तुरळक वाहतूक असली तरी येणारे-जाणारे त्या मोटारसायकलकडे कुतूहलानं पाहत होते. कुणी स्वतःची गाडी अशी रस्त्यात आडवी लावेल, यावर विश्‍वासच बसत नव्हता. कदाचित एखाद्यानं त्याच्या वैऱ्याची मोटारसायकल इथं आणून लावली असावी, असं वाटत होतं.

पण रात्री बरोबर बारा वाजता चारही बाजूंनी पोरं त्या मोटारसायकलच्या दिशेनं धावत आली… अगदी हल्ला केल्यासारखी! वाटलं, आता मोटारसायकल पेटवणार. पण त्यातल्या एकानं बॉक्‍समधला केक काढला आणि मोटारसायकलच्या सीटवर ठेवला. मग त्या गर्दीतल्या एकानं तो कापला आणि सगळे जोरजोरात ओरडू लागले.

ठरवलं तर या संपूर्ण प्रसंगाकडे कानाडोळा करणं सहज शक्‍य आहे. “ज्याचं त्याला, गाढव ओझ्याला’ असं म्हणावं आणि गप्प राहावं! पण विश्‍लेषण करायचं ठरवलं तर डोकं फिरून जाईल. रस्त्यावर सेलिब्रेशन करणं कदाचित समजून घेता येईल. तलवारीचं प्रेमसुद्धा एकवेळ समजून घेता येईल; पण सुमारे तासभर आधी एखादी मोटारसायकल रस्त्यात मध्यभागी आडवी लावून ठेवण्यामागे, येणाऱ्या-जाणाऱ्यांना कोडं घालण्यामागे काय मानसिकता असेल? असे न सुटणारे प्रश्‍न वाढत जाणं हिताचं नक्‍कीच नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.