राज्यसभेमध्ये काल गर्भपातविषयक चिकित्सा सुधारणा विधेयक २०२० मंजूर करण्यात आलं. लोकसभेमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकानुसार २४ आठवड्यांपर्यंत वाढ झालेल्या गर्भाचा गर्भपात करण्यास परवानगी मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांची प्रतिष्ठा आणि या प्रक्रियेतील गोपनीयता कायम ठेवण्याच्या दृष्टीनं तरतूद करण्यात आली आहे.
सरकारनं आरोग्य क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी अनेक पावलं उचलली असून या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून हे विधेयक मांडण्यात आलं आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २०१४ मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या ५० हजार जागा होत्या. त्यामध्ये वाढ करून आता त्या ८० हजार करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.