पिंपरी – गरोदर असताना विवाहितेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या टाकून तिचा गर्भपात केला. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शेखर रामदास वाघुले (वय 30, रा. अमृतवेल कॉलनी, रहाटणी), सासरे रामदास वाघुले, सासू आशा वाघुले (दोघे रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने सोमवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन माहेरहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली.
कौटुंबिक कारणांवरून मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादी विवाहिता गरोदर असताना आरोपी पती शेखर याने विवाहितेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्स केल्या. त्याद्वारे तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संगीता गोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.