नवी दिल्ली – करोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनावरील लसीबाबत महत्वपूर्ण दावा केला आहे. तीन-चार आठवड्यात करोनावरील लस येईल. तसेच महामारी आपोआप संपुष्टात येईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
पेन्सिलवेनिया येथे मतदारांसोबत चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, करोनावरील लस बनवण्याच्या आपण अगदी जवळ आहोत. यास आता फक्त तीन किंवा चार आठवडे लागू शकतात, असे महत्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, या विधानाच्या काही तासांआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना लसीसाठी चार किंवा आठ आठवडे लागतील, असे सांगितले होते.
तसेच यावेळी ट्रम्प यांनी करोना व्हायरस आपोआप नष्ट होईल. परंतु, लस आल्याने लवकर यावर नियंत्रण मिळवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, डेमोक्रेट्स पक्षाने चिंता व्यक्त केली असून डोनाल्ड ट्रम्प सरकारी आरोग्य नियामक आणि वैज्ञानिकांवर लवकरात लवकर करोनावरील लस बनविण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे.